Delhi Violence : जमावाला भडकविल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या इशरत जहाँ अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावला असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. आज दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहां यांना अटक केली. मागील 50 दिवसांपासून इशरत जहां दिल्लीतील खुरेजी भागात नागरिकता संशोधन कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. इशरत जहां यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Advt.

मागच्या रविवारी खुरेजी रोड जाम करण्यात आला होता. याप्रकरणी इशरात जहां यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. सीएएविरुद्ध उत्तर पूर्व दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी हिंसा भडकली होती. जेथे जास्त हिंसाचार उसळला होता, तेथे अजूनही जमावबंदी लागू आहे. मात्र शनिवारी वातावरण शांत होते.

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 42 नागरिकांचा बळी गेल असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. हिंसाचार प्रकरणी न्यायालयाने दखल घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 123 एफआयआर दाखल केल्या असून 630 आरोपींना ताब्यात घेतले आहे. हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी दोन एसआयटी टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. पुन्हा कोणताही अप्रीय प्रकार घडू नये यासाठी अजूनही सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. उत्तर पूर्व दिल्लीत ज्या ठिकाणी हिंसाचार उसळला होता तेथे 24 फेब्रुवारीपासून 7 हजारपेक्षा जास्त जवान तैनात आहेत.