दिल्ली हिंसाचाराचं भयानक दृश्य आलं समोर, रतनलाल यांच्यावरील हल्ल्याचा ‘व्हिडीओ’ आला समोर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात लोक डीसीपीवर (DCP) दगडफेक करताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणाचे २ व्हिडीओ आतापर्यंत समोर आले असून दिल्ली पोलिसांनी ते खरे असल्याचं सांगितलं आहे. हे व्हिडिओ २४ फेब्रुवारीचे असून त्यामध्ये जमाव पोलिसांवर दगडफेक करत आहे, हा व्हिडिओ दिल्लीतील चांदबाग परिसरातील आहे, अशी माहिती समोर येत आहे.

डीसीपी बेशुद्ध अवस्थेत पडले डिव्हायडरजवळ

दिल्ली पोलिसचे एसीपी अनुज यांनी माहिती दिली आहे की, ‘या व्हिडिओमधील घटना २४ तारखेची आहे. या दिवशी वजीराबाद रोडवर अचानक जमाव जमा झाला, या जमावातून आम्ही कसेबसे खासगी मार्गाने यमुना विहारला पोहोचलो. परंतु त्याचवेळी डीसीपी बेशुद्ध अवस्थेत डिव्हायडरजवळ पडले होते.’

दगडफेकीनंतर झाला गोळीबार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ २४ फेब्रुवारीचा आहे. तसेच त्या दिवशी चांदबाग जवळील दोन गटात भांडणं झाली होती. या भांडणाची बातमी समजताच डीसीपी अमित शर्मा आपल्या पथकाला घेऊन चांदबाग परिसरात पोहोचले. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यावर जमावाने पोलिसांवर दगडफेक केला. ही दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला मात्र, दगडफेक इतक्या प्रमाणात वाढली की पोलिसांना माघार घेण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. या दगडफेकी सोबतच गोळीबारही करण्यात आला होता. दरम्यान गुन्हे शाखेचे एसआयटी पथक या व्हिडिओबाबत तपास करत आहे, तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व पोलिसांची चौकशी करण्यात आली असून या जमावातील दरोडेखोरांनी रतन लालवर गोळीबार केल्याचा दावा केलेला आहे.

या हिंसाचाराला जबाबदार कोण?

दिल्ली हिंसाचारात मागील रविवार ते बुधवार पर्यंत उत्तर-पूर्व दिल्लीमधील अनेक भाग जळून खाक झाले आहेत. सध्या हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की हा सगळा कट कोणाचा होता? या प्रश्नांची उत्तरं सध्या शोधली जात आहेत. सध्या उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचारानंतर परिस्थिती सामान्य झाली आहे. बँका, रुग्णालयं आणि दुकानं उघडली असून लोक पूर्वीप्रमाणे बाहेर निघून दैनंदिन कामकाजात व्यस्त आहेत.