CAA च्या विरोधात ना समर्थनात, तरीही फातिमाचं सर्वच झालं उध्दवस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या मोर्चाला दिल्लीत हिंसक वळण लागले. पोलिसांनी ही दंगल आटोक्यात आणली असली, सध्या हिंसाचार जरी शांत झाला असला तरीही, परिस्थिती अजून तणावपूर्ण आहे. या दंगलीत ४२ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पोलीस जखमी झाले आहेत. या दंगलीचा परिणाम कित्येक कुटुंबावर झाला असून, सीएए आणि एनआरसी आंदोलनात पाठिंबा आणि विरोध काही न दर्शविणाऱ्या कुटुंबियांना सुद्धा काही ना काही भोगावे लागत आहे.

सध्या उत्तर दिल्लीतील जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे आणि काही प्रमाणात जीवनाश्यक वस्तू उपलब्ध होत आहेत. तिथे जी घरे आगीत जळून खाक झाली आहेत त्या कुटुंबियांना २५ हजार रुपयांची मदत केली जात आहे. या हिंसाचारात ५०० पेक्षा अधिक वाहने जळाली आहेत. ५२ दुकाने लुटली गेली आहेत. काही ठिकाणची जमावबंदी शिथिल करण्यात आली असली तरीही ७ हजार निमलष्करी दलाचे जवान आणि सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. या दंगलीतील एक फोटो भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने शेअर केला आहे.

हरभजन सिंग ने फातिमा नावाच्या ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून दंगलीत नक्की कोणाचे घर जाळले ते सांगण्याचा प्रयत्न हरभजनने केला आहे. फातिमा यांचा नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी ला विरोध आणि पाठिंबा काहीही नव्हते. तरीही फातिमा ह्यांचे दुकान या दंगलीत जाळण्यात आले असून, त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायावर च ते आपले व कुटुंबाचे पोट भरत होत्या.

फातिमा यांनी दंगल होण्याआधी २ दिवस ५० हजार रुपयांची संत्री विकायला आणली होती. दंगलीत माझे दुकानच जाळल्यामुळे माझे नुकसान मी कसे भरून काढणार याची चिंता फातिमा यांना सतावत आहे. या दंगलीचा फटका सर्वसामान्य लोकांना जास्त बसला आहे असे हरभजनने या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो त्याने आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे.