दिल्ली हिंसाचार : भाजपच्या ‘या’ नेत्यांवर FIR दाखल होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीतील हिंसाचारावरून दिल्ली हायकोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. प्रक्षोभक भाषण देणाऱ्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे भाजप नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा आणि परवेश वर्मा यांच्यावर एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर हे केंद्रीय मंत्री आहेत तर परवेश शर्मा हे पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत.

सीएएवरून झालेल्या हिंसाचारसंबंधी भाजपच्या तीन नेत्यांच्या कथित प्रक्षोभक भाषणांची तपासणी करून निर्णय घ्या. आणि उद्यापर्य़ंत कोर्टाला यासंबंधी माहिती कळवा, असे हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि.27) पुन्हा सुनावणी होणार आहे. प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांवर आधी कारवाई का झाली नाही ? यावेळी दिल्लीतील 1984 च्या दंगलीसारखे वातावरण होऊ देणार नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली. त्यावेळी हायकोर्टात भाजपच्या तीनही नेत्यांच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांना युक्तीवाद केला.

कपील मिश्रा यांनी 23 फेब्रुवारीला मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ सीएए समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीत मिश्रा यांनी प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यासंबंधी सोशल मीडियावर ट्विटही करण्यात आले होते. हायकोर्टात मिश्रा, वर्मा आणि ठाकरू यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. दिल्लीतील हिंसाचार प्रकरणातील मृतांची संख्या 25 झाली आहे.