Delhi Violence : दिल्ली हिंसाचारावर PM नरेंद्र मोदींनी केलं ‘ट्विट’, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले असून सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला आहे. या हिंसाचारात एका पोलिसासह जवळपास २० जणांचा बळी गेला आहे. तसेच या हिंसाचारामुळे २०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हिंसाचाराबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी ट्विटमधून सांगितले आहे की दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून पोलीस आणि इतर यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की, त्यांनी शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत राहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्त्वाचं आहे’ असं त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी सीलमपूरमध्ये बैठक घेतली. डोवाल यांनी मौजपूर, गोकुलपुरी आणि जाफराबाद येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा देखील घेतला आहे.

दरम्यान दिल्लीमधील आंदोलनाने घेतलेल्या हिंसक वळणामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या हिंसाचारामुळे जाफराबाद, चांद बाग, मौजपूर, कारावाल नगर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दंगा माजवणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देखील दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करू. असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत उसळलेल्या या जातीय दंगलींवरून केंद्र सरकार आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित असून दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई केली नाही, असे म्हटले आणि या हिंसाचारास गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

दिल्लीत उसळलेल्या या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीमध्ये घेण्यात अली. या बैठकीत दिल्लीमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असून बैठक झाल्यानंतर सोनिया गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सोनिया गांधींनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

You might also like