26 जानेवारीला दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित; SIT चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले होते. या हिंसाचाराची दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या SIT कडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीमध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली असून दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेल्या उपद्रवाचा कट आधीपासून ठरवण्यात आला होता. काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर उपद्रव करण्यासाठी एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. म्हणजे आंदोलकांमध्ये सामील होऊन उपद्रव करून त्यामध्ये आंदोलनकर्त्यांनाही सामील करणे, असा हेतू होता. अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितींनुसार हाती लागलेल्या एका व्हिडिओमध्ये इकबाल सिंग दिसत असून तो जमावाला भडकावत असल्याचे दिसते. त्याच्या सोबत असणारे काही लोकही जमावाला भडकावण्याचेच काम करत होते. त्यामुळे या हिंसाचार प्रकरणात इकबाल सिंग हा महत्वाचा मोहरा असल्याचे सागंण्यात येत आहे. त्यानेच लाल किल्ल्यात जमाव जमवला आणि त्यांना लाहोर दरवाजा तोडण्यासाठी भडकावले. यानंतरच उपद्रवी जमावाने लाल किल्ल्याचा लाहोर दरवाजा तोडला. तसेच लाल किल्ल्यावर सर्वात वर आपल्या धर्माचा झेंडा फडकावण्याची त्यांची इच्छा होती, अशी माहितीही समोर आली आहे. त्याच बरोबर इकबाल सिंगवर दिल्ली पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

आतापर्यंत १२४ हून अधिक लोकांना अटक
२६ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचची SIT चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल १२४ जणांना अटक केली आहे. तर दाखल केलेल्या ४४ गुन्ह्यांपैकी १४ प्रकरणांचा तपास SIT करत आहे. या शिवाय पोलिसांकडून ७० हून अधिक लोकांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत.

ग्रेटाचं ‘ते’ ट्विट –
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे आम्ही एकजुटीने उभे आहोत, असे तिने म्हटले होते. याशिवाय तिने आणखी एक ट्विट करत एक डॉक्युमेंटदेखील शेअर केले होते. त्यामध्ये भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याच्या रणनीतीचा उल्लेख होता. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव आणण्याचाही उल्लेख यामध्ये होता. मात्र, चूक लक्षात आल्यानर ग्रेटाने तत्काळ हे ट्विट डिलीट केले.