दिल्ली हिंसाचार : नाल्यात आढळले आणखी 3 मृतदेह, मृतांचा आकडा 45 वर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील मृतांची संख्या अजूनही वाढतच आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना आज तीन मृतदेह आढळून आलेत. एक मृतदेह गोकळपुरी भागातील नाल्यात आढळला तर दोन मृतदेह त्याच परिसरातील भागीरथी विहार नाल्यातून पोलिसांनी बाहेर काढले. या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हिंसाचारात मृतांचा आकडा 45 वर गेला आहे. तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत.

आज (रविवारी) सकाळी 11 वाजता पहिला एक मृतदेह सापडला, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत एकूण तीन मृतदेह आढळून आले. गोकुळपुरी नाल्यातून एक आणि भागीरथी नाल्यातून दोन मृतदेह सापल्याचे सांगण्यात आले. दुर्गंधी आल्यानंतर लोकांनी पोलिसांना कळवले, त्यानंतर शोध मोहीम राबवून पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

दिल्ली पोलिसांनी सांगितले
गोकुळपुरीतील नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला. आयबी अधिकारी अंकित शर्मा यांचाही याच नाल्यात मृतदेह आढळून आला होता, असे पोलिसांनी सांगितले. तर भागीरथी विहारमधील नाल्यात दोन मृतदेह आढळले. तिन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कपिल मिश्रांकडे दुर्लक्ष करा
हिंसाचारानंतर ईशान्य दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतंय. दिल्ली सरकारकडून हिंसाचार पीडितांसाठी मदत जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर श्री श्री रविशंकर यांनी आज हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. या दरम्यान ते ब्रह्मपुरी भागात पोहोचले. यावेळी त्यांनी भाजप नेते कपिल मिश्रांवर हल्लाबोल केला. कपिल मिश्रांच्या वक्तव्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावं, असा टोला त्यांनी लगावला.