दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू, संपूर्ण देशाचे लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात उत्सुकता असलेल्या दिल्ली विधानसभेच्या मतदानाला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. विधानसभेसाठी ७० जागा असून ६५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी तिरंगी कडवी लढत आहे. वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील प्रभावी कामगिरी आणि अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व अशा मुद्द्यांवर आम आदमी पार्टी निवडणूक लढवत आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्दे प्रचारात मांडले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारात सलगपणे भाग घेऊन लढत प्रतिष्ठेची केली. दिल्लीचा विकास आणि भाजपचे विद्वेषाचे राजकारण हे मुद्दे काँग्रेसने प्रचारात मांडले. दरम्यान, दिल्लीत चालू असलेल्या शाहीन बाग आंदोलनामुळे प्रचाराचा मुद्दा तापला आणि देशाचे लक्ष वेधले गेले.