पार्सल उशीरा आल्याने महिलेने डिलिव्हरी बॉयला सुऱ्याने भोसकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फ्लिपकार्टवरून मागवलेल्या फोनची डिलिव्हरी उशीरा आल्याच्या रागातून तीस वर्षीय महिलेने फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला तीक्ष्ण हत्याराने भोसकले. या महिलेने त्याच्यावर सुऱ्याने वार करून मरणासन्न अवस्थेत फेकून दिले. या हल्ल्यात फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात हल्लेखोर महिला कमल दिप आणि तिच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. कमलने काही दिवसांपूर्वी संबधित ‘इ-कॉमर्स साईट’वरून स्वत:साठी मोबाईल फोन मागवला होता. निहाल विहार परिसरात हा प्रकार घडला आहे. फोनची डिलिव्हरी उशीरा आली या कारणावरून या महिलेने डिलिव्हरी बॉयला खडे बोल सुनावले तसेच चाकूने भोसकून त्याच्याकडून ४० हजारांची रोकडही लुटल्याचे पोलिसांनी सांगितले. कमल आणि तिच्या भावाने मिळून त्या डिलिव्हरी बॉयला चंदन विहार परिसरात फेकून दिले. महिलेच्या घराचा पत्ता सापडत नसल्याने पार्सल पोहोचविण्यात उशीर झाल्याचे कारण त्याने सांगितले. पण महिलेने मात्र आपली बाजू समजून न घेता हल्ला केल्याचा आरोप त्याने केला आहे.

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांचाही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयची प्रकृती मात्र गंभीर आहे.