‘बॅचलर पार्टी’साठी ‘पटाया’ला गेला दिल्‍लीचा मुलगा, तेथून आली मृत्यूची बातमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील अशोक नगरमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा थायलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. सौरभ शर्मा असे या मृत युवकाचे नाव असून तो बॅचलर पार्टी करण्यासाठी थायलंडला गेला होता. मात्र पाटयामधील एका हॉटेलमध्ये तो मृतावस्थेत आढळला. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये त्याचा मृत्यू झाला. पेशाने इंजिनिअर असलेल्या सौरभ याचे 21 नोव्हेंबर रोजी लग्न होते. त्यामुळे तो आपल्या मित्रांसह बॅचलर पार्टी करण्यासाठी थायलंडला गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार,आपल्या मित्रांसह तो हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही खाल्ल्यानंतर तो पोहण्यासाठी गेला असता अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. 36 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर शेवटी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या वडिलांनी हॉटेलकडे सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर हॉटेलने ते देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू वाटेत झाला असेल तर हॉस्पिटलने आमच्याकडून 18 लाख रुपये बिल का घेतले असा आरोप देखील सौरभच्या वडिलांनी केला आहे. मात्र त्यानंतर पोलिसांनी आपला जबाब बदलल्याचा आरोप देखील त्याच्या वडिलांनी केला आहे.

दरम्यान, मृत तरुणाचे नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होते. यासाठी कुटुंबाने तयारी देखील सुरु केली होती. मात्र काही दिवसांतच तो आनंद मावळला आहे. त्याच्या आईचे 10 वर्षांपूर्वीच निधन झाले असून तो आपल्या वडिलांसह दिल्लीतील अशोक नगरमध्ये राहत होता. त्याला दोन बहिणी असून दोघींचाही विवाह झालेला आहे.

Visit : policenama.com