दिल्लीतील ते ११ अंधश्रद्धेचे बळी

दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीतील बुरारीमधील ज्या घरात ११ जणांचे मृतदेह आढळले, त्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमधील माहिती अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांना तपासादरम्यान घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये जो मजकूर आहे, अगदी त्याचप्रकारे घरातील एका खोलीत १० मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर अकरावा मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडला. ‘तुम्ही जर टेबलाचा वापर करुन डोळे बंद केलेत आणि हात बांधलेत, तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल,’ असा मजकूर रजिस्टरमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून या कुटुंबाने स्वत:चा अंत केला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीतील बुरारी भागात एकाच घरात ११ जणांचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे काल आढळून आले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही रजिस्टरमधील काही पानांमधील माहिती धक्कादायक आहे. कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकायला हवं, याचा तपशील रजिस्टरमध्ये आहे. कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने कुठे लटकूवन जीव द्यावा, याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह अगदी रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीनुसार लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत.  मात्र खरंच यामागे अंधश्रद्धा आहे की तसा देखावा करुन पोलिसांची दिशाभूल केली जात आहे, याचाही तपास सध्या सुरू आहे.