दोन लाखांच्या ऐवजासह डिलिवरी बाॅय पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ग्राहकांना डिलीवरी करण्यासाठी दिलेले कंपनीचे घड्याळ, मोबाईल, कॅमेरा व घड्याळ असा २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज कामगारानेच लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कामगाराविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बळवंत कांबळे (४५, अतुलनगर, उंड्री) यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून कामागाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ईस्टा कार्ट सर्विसेस प्रा. लि. कंपनीतीलच्या वडगाव शेरी येथील कार्यालयात ११ ऑक्टोबर २०१८ ते ५ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्टा कार्ट सर्विसेस प्रा. लि. कंपनी ई कॉमर्स कंपन्यांच्या ऑर्डरची ग्राहकांना डिलीवरी करण्याचे काम करते. त्यांच्या कंपनीत संबंधित कामगाराकडे दिवाळीच्या कालावधीत ग्राहकांना डिलीवरी देण्यासाठी साहित्य देण्यात आले होते. त्यानंतर त्याने डिलिवरीसाठी दिलेले घड्याळ, मोबाईल, कॅमेरा, व इतर साहित्य असा दोन लाख ४० हजारांचा ऐवज परस्पर लंपास केला. कंपनीने केलेल्या ऑडीटमध्ये हा प्रकार उघड झाल्यावर त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस हवालदार अजीत धुमाळ करत आहेत.