नाभिक समाजाला महिना पाच हजार रूपये अर्थिक पॅकेज व विमा उतरविण्याची मागणी

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने शिरूर तालुक्यातील नाभिक समाजाचे व्यवसाय गेले महिनाभरापासुन बंद असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवताना त्यांना मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नाभिक समाजाला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करुन प्रति महिना पाच हजार रु.मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे.

त्याचबरोबर लॉकडाऊननंतर दुकानांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन नाभिक व्यावसायिक कारागीर यांना वैद्यकिय सेवेत जसे सुरक्षित किट,चष्मा, हँड ग्लोव्हज, ड्रेस दिला जातो तशी सुविधा पुरविण्याची व्यवस्था करून पंन्नास लाखांचा विमा उतरवावा तसेच घर व दुकान भाडे, थकीत कर्जाचे हफ्ते व त्यावरिल दिर्घ व्याज माफ करून नाभिक समाजाला मदत करण्याची मागणी नाभिक संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष गणपत क्षिरसागर यांनी शिरूरचे तहसिलदार यांना निवेदन देऊन केली आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष गणपत क्षिरसागर, सचिव दत्तात्रय शिंदे, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पंडीत, दादासाहेब साळुंके आदि उपस्थित होते. महाराष्ट्रात नाभिक सलुन व्यावसायिक कारागीर यांची संख्या अंदाजित तीस लाखापेक्षा जास्त आहे.सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणची उच्च पदस्थ व्यक्ती नाभिक समाज बांधवांवर दडपण,धाक टाकुन बळजबरीने त्यांच्या घरी, शेतात व अन्य ठिकाणी दाढी कटिंग करुन घेण्यासाठी बोलावुन घेतात अशा वेळी कायद्याचे उल्लंघन केले म्हणुन नाभिक समाज बांधवावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होत असुन जे दडपण टाकुन बोलवतात असे धनदांडगे लोक मोकळे सुटत आहेत त्यामुळे हा या समाजावर अन्याय असुन अशा व्यक्ती विरुध्द हि गुन्हे दाखल करावे हि आमची प्रमुख मागणी असल्याचे मंगळवार दि.२१ रोजी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.