विठ्ठलाच्या गर्भगृहातील स्नानानंतर अधिकार्‍यांवर यांनी केली कारवाईची मागणी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा करते वेळी गाभाऱ्यात स्नान करुन विठ्ठल भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्यावरती आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी, संभाजी ब्रिगेड आणि भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिवर्षी आषाढ यात्रा झाल्यानंतर प्रक्षाळ पूजा केली जाते. या दिवशी संपूर्ण मंदिर धुतले जाते. तसेच देवाचा थकवा दूर व्हावा यासाठी लिंबू साखर लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते. यावर्षीची प्रक्षाळ पूजा ९ जुलै रोजी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते पार पडली. पूजेवेळी श्री विठ्ठलाला अभिषेक व स्नान घालण्यात आले. त्यावेळी तिथे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी सुद्धा उपस्थित होते. पूजेवेळी एका पुजाऱ्याने देवाच्या समोर कार्यकारी अधिकारी जोशी आणि व्यवस्थापक पुदलवाड यांना स्नान घातले होते. याचा व्हिडीओ सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, घडलेला हा प्रकार निषेधार्ह असून अधिकाऱ्यांच्या स्नानाबद्दल भागवताचार्य वा. ना उत्पात यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेड व भाजपाने देखील या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. मंदिर समितीने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे यांनी केली आहे. तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय वाईकर यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी केली आहे. दरम्यान, गाभाऱ्यातील स्नानानंतर अधिकाऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या असून, या प्रकरणी मंदिर समिती काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.