रामदास आठवलेंनी मागितल्या विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा संपल्यानंतर प्रत्येक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे दहा जागांची मागणी केली आहे. केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपदही मिळेल असा दावाही आठवलेंनी केला आहे.

रामदास आठवले सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, के. डी. कांबळे, बाबू बनसोडे, राजरत्न इंगळे, चंद्रकांत वाघमारे, राजू ओहोळ, सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होत आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी सुद्धा पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभा सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या व्हायच्या, पण मते मिळत नव्हती. असा दावा आठवलेंनी सोलापूर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आठवलेंच्या या विधानावरून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.