धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पुणे : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व धर्मांची धार्मिक स्थळांसह मस्जिद २१ मार्चपासून बंद करण्यात आलेली आहेत. आज या घटनेला ६ महिने झाले असून अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत.त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातीलही मंदिर, मस्जिदसह सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक हाजी अब्दुल गफुर पठाण यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव तसेच मोहरमचे ताबुत बसत आहे. मंदिरे खुली करण्यास परवानगी दिल्यास नागरिकांना गणेशोत्सव काळात देवदेवतांचे दर्शन घेता येईल. मंदिरांच्या परिसरातील फुले, हार, प्रसाद विक्रेत्यांचे या लॉकडाऊनच्या काळात मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची नितांत गरज आहे.

सर्व मस्जिदमध्ये एका वेळेस ५० ते ७५ भाविकांना प्रवेश देऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून नमाज अदा करण्यासाठी परवानगी दिल्यास मुस्लिम बांधव हे सर्व नियम पाळून मस्जिदमध्ये नमाज अदा करतील.

दिवसभरात ५ वेळा नमाज अदा केली जाते व साधारण ५ ते १० मिनिटे वेळ नमाजासाठी लागतात. त्यामुळे फक्त नमाजच्या काळातच मस्जिदमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती अ‍ॅड. पठाण यांनी केली आहे.