पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कडून ‘राहुल गांधी’ यांच्या सभांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा आणि रॅलिंसोबतच ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट या तरुण नेत्यांच्या सभांचे आयोजन करावे या मागणीवर काँग्रेस च्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी जोर दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तयारी साठी काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, आजी माजी आमदारांची आज बैठक झाली. प्रचार प्रमुख ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीस माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचे शहर आणि जिल्हा प्रमुख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अगदी बूथ निहाय रचना, प्रचार साहित्य, प्रमुख नेत्यांच्या सभा, पदयात्रांचे नियोजन यावर विस्तृत चर्चा झाली.

यावेळी जवळपास सर्वच शहर आणि जिल्हा प्रमुखांनी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा अथवा रॅली ची मागणी केली. राहुल यांच्या पाठोपाठ ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट या तरुण नेत्यांसोबतच औद्योगिक क्षेत्रातील मेळाव्यांसाठी पी. चिदंबरम, कपिल सीब्बल यांची मागणी केली.

पक्षीय स्तरावर लवकरच स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तत्पुर्वी जिल्हाध्यक्षांची मागणी पक्ष नेतृत्वाला कळविण्यात येईल, असे आश्वासन प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.