‘त्या’ पंचायत समिती सदस्यांच्या पतीकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथील पंचायत समितीच्या सदस्याचे पती व एका हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांची खंडणी मागून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चाकणमधील नाणेकरवाडी येथे मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली.

याबाबत गणेश शांताराम जाधव (वय ३५, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी कुख्यात गुंड बाळू आप्पा वाघेरे (रा. पिंपरी,), रामनाथ सोनवणे (रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) आणि त्यांच्या ३ ते ४ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जाधव यांचे दाजी रमण पवार (रा. ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांचे ब्ल्यू वॉटर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान गणेश जाधव हे या हॉटेलवर असताना बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी या हॉटेलवर जाऊन गणेश यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावले. तसेच ती न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपींनी फोनद्वारे आणि रस्त्यात गाडी अडवूनदेखील धमकावले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे तपास करत आहेत.