राष्ट्रवादी आमदाराच्या नावानं ‘कंपनी’ अन् बिल्डरांकडे ‘खंडणी’ची मागणी, सुनिल टिंगरेंनी दिली पोलिसांकडे तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नावाने बिल्डरांसह काही कंपन्यांना धमक्या देऊन खंडणीची मागणी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खुद्द आमदार सुनिल टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

वडगाव शेरी मतदारसंघातील काही बिल्डरांना एका मोबाईल क्रमांकावरुन आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून बोलत असल्याचे सांगून पैशांची मागणी करण्यात येत होती. ज्या मोबाईलवरुन हा फोन येत होता. त्याच्या टु कॉलरवर एमएलए सुनिल टिंगरे असे नाव फोन घेणाऱ्याला दिसत होते. त्यामुळे तो फोन खरोखरच आमदार टिंगरे यांच्याकडून आला असल्याचे लोकांना वाटत होते. इतरांप्रमाणे असाच फोन एका बांधकाम व्यावसायिकाला या मोबाईलवरुन कॉल गेला.

त्यांच्याकडेही पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, हे बांधकाम व्यावसायिक आमदार टिंगरे यांच्या परिचयाचे होते. त्यांनी आमदार टिंगरे यांना फोन करुन त्याबाबत विचारणा केली. तेव्हा टिंगरे यांना आपल्या नावावर कोणीतरी खंडणी मागत असल्याचे लक्षात आले. त्यांनी चौकशी केल्यावर बिल्डरांंबरोबरच वडगाव शेरी मतदारसंघातील वेगवेगळ्या संस्था आणि काही कंपन्यांनाही अशा पद्धतीने पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आमदार टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा पद्धतीने कोणाकडून पैशांची मागणी आल्यास तत्काळ आपल्याला किंवा विश्रांतवाडी पोलिसांना कळवावे, असे आवाहन टिंगरे यांनी केले आहे.

You might also like