Pune News : पुण्यात पालक संघटनांकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरातील खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने फी वाढ करण्यात आली आहे. या असंख्य मागण्याचे निवेदन आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना बालभारती येथे कार्यक्रमासाठी आले असताना पालक संघटनांकडून निवेदन देण्यात आले. पण त्यावेळी वर्षा गायकवाड यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने पालक आक्रमक होऊन, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

पालक संघटनांच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे म्हणाल्या की, खाजगी शाळांच्या मनमानी बाबत ठोस निर्णय घेतला गेला नाही. तर 30 जानेवारीला वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

बालभारती समोर पालकांनी शिक्षण मंत्र्यांविरोधात केलेल्या निदर्शनांमुळे उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. शिक्षणमंत्री निघून गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पालक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या जोरदार बाचाबाची झाली. यामुळे परिसरात तणावाचे वातवरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. मात्र वाद मिटत नसल्याने पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना परिसरातून बाजूला नेले.