यवतमाळ : देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तपास सुरु असताना भाजपचे काही लोक विनाकारण बंजारा समाजाची बदनामी करीत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड हे लोक बंजारा समाजाची, पूजा चव्हाणच्या कुटुंबाची बदनामी करुन चारित्र्यहनन करीत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड यांनी केली आहे. मानोरा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे.

मानोरा पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात राठोड यांनी म्हटले आहे की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून आम्हालाही दु:ख आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. मात्र, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड आदी लोक बंजारा समाजाची, पूजा चव्हाणच्या कुटुंबाची बदनामी करुन चारित्र्यहनन करीत आहेत. याशिवाय पोलीस तपासात अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे संबंधित नेते व मिडियावर कारवाई करावी. अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे आंदोलन करु, असा इशाराही या तक्रारीत दिला आहे.

या तक्रारीबाबत तपास सुरु करण्यात आला असून वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे मानोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.