जिल्ह्यातील नाभिक समाजाला सलून दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी अथवा शासनाने मदत करावी : सचिन कालेकर

जेजुरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेली ५० दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्हातील सर्वच नाभिक बांधवांची सलून दुकाने बंद असल्याने समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यातील ऑरेंज व ग्रीन झोन असणाऱ्या तालुक्यात अटी शर्थीचे पालन करून सलून दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी अथवा उदरनिर्वाहासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये प्रतीमहिना मदत करावी अशी मागणी पुणे जिल्ह्याचे नाभिक समाजाचे नेते सचिन कालेकर यांनी केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली दीडमहिन्यापासून जगभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अत्यावशक सेवा,दारूची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेली दीड महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील सर्वच सलून दुकाने बंद ठेवल्याने समाज बांधवांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे.

अद्याप कसलीही मदत न मिळाल्याने सलून व्यवसाय सुरु केल्याशिवाय आता पर्याय राहिला नाही , कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी समाज बांधव आपल्या दुकानातील दोन खुर्च्यातील अंतर पाच फुट ठेवतील, कारागीर सेफ्टी किटसचा वापर करतील, दुकाना बाहेर वॉश बेसिन,सेनीटायझर ,अथवा साबण ठेवण्यात येतील.प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र टॉवेल वापरण्यात येईल,सलून मधील सर्व साहित्य निर्जंतुकीकरण केले जाईल, दुकाने सुरु करण्यापूर्वी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण केली जाईल. प्रत्येक ग्राहकांचे नाव,मोबाईल नंबर पत्ता रजिस्टर मध्ये ठेवले जाईल ,आदी नियम समाज बांधव पाळण्यास तयार आहेत असे कालेकर यांनी सांगितले.

समाजाची उपासमार थांबविण्यासाठी शासनाने ऑरेंज व ग्रीन झोन मधील सलून दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी अन्यथा लॉकडाऊन उठे पर्यंत समाज बांधवाना उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक मदत करावी हि मागणी समाजाची असून आमदार अतुल बेनके यांनीही याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समाज बांधवांचे मागणीचे पत्र दिले असल्याचे जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष व जिल्ह्याचे नेते सचिन कालेकर यांनी सांगितले.