50 हजाराच्या लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : वृत्त संस्था – गुटखा विक्रीबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात कारवाई करु नये, यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यापैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईकासह एका खासगी व्यक्तीला अटक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सचिन हणमंत गिड्डे (कोपरखैरणे पोलीस ठाणे), पोलीस नाईक सूर्यभान रघुनाथ पाटील (गुन्हे शाखा, नवी मुंबई) आणि खासगी व्यक्ती प्रमोद बाबासाहेब चव्हाण (वय३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई शिरीष बाबासाहेब चव्हाण हा पळून गेला असून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुटखा विक्री अंतर्गत अन्न व औषधे प्रशासन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात तक्रारदार याच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी पोलीस शिपाई शिरीष चव्हाण याचा भाऊ प्रमोद याच्यामार्फत ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदारांनी १० जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्याची पडताळणी करत असताना त्यात पोलीस उपनिरीक्षक सचिन गिड्डेसह आणखी दोन पोलीस सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी तडजोडीत ३० हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. रविवारी सायंकाळी पोलीस नाईक सूर्यभान पाटील याला २० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर तातडीने इतर दोघांना पकडले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/