युवासेनेची मागणी : विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना रद्द करून राज्य शासनाच्या निर्देशाचे तात्काळ पालन करावे

वाघोली : युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेची लोणी काळभोर, पुणे येथील MIT ADT स्वायत्त विद्यापीठात धडक. परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना रद्द करून राज्य शासनाच्या निर्देशाचे तात्काळ पालन करण्याची युवासेनेची मागणी.

सध्याच्या कोविड-१९ या वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असेल अथवा नसेल त्यांनी तसे लेखी स्वरूपात संबंधित विद्यापीठाला कळवायचे आहे, असा शासन निर्णय दि.१९ जून, २०२० रोजी जाहिर झालेला असताना लोणी काळभोर, पुणे येथील MIT ADT स्वायत्त विद्यापीठाने ह्या शासन निर्णयाचे पालन न करता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी हायस्पीड इंटरनेट, लॅपटॉप किंवा संगणक, वेबकॅम आणि एक स्वतंत्र खोली इत्यादी बाबी अनिवार्य करत परस्पर मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना केल्या होत्या.

सदर विद्यापीठातले ५० टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागात राहत असल्याने त्यांना हायस्पीड इंटरनेट कनेक्शनची व्यवस्था होऊ शकत नाही. काही विद्यार्थ्यांनी आपले स्टडी मटेरीअल हे वसतिगृहात ठेऊन ते आपआपल्या गावी गेले आहे त्यामुळे त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. तसेच जर एखाद्या विद्यार्थ्याचा परिक्षावेळी सर्व्हर डिस्कनेट झाला तर आपोआप परिक्षा संपेल आणि ती पुन्हा सुरू केली जाऊ शकत नाही.

त्यामुळे ह्या अशा जाचक धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून MIT ADT विद्यापीठाने जाहिर केलेल्या परिक्षा संदर्भातील मार्गदर्शक सुचना तातडीने रद्द करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाचे पालन करावे, अशी मागणी युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम व युवासेना विस्तारक सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा युवा अधिकारी विशाल सातव, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी शादाब मुलाणी यांनी MIT ADT विद्यापीठाचे डीन डॉ.मंगेश कराड यांना भेटून युवासेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी डॉ.मंगेश कराड यांनी MIT ADT विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना रद्द करून राज्य शासनाच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे युवासेना शिष्टमंडळाला सांगून याबाबतचा निर्णय विद्यार्थ्यांना तात्काळ कळवला जाईल असे सांगितले. यावेळी युवासेना समन्वयक प्रकाश लोले , उपतालुका प्रमुख श्रेयश वळटे, विभाग प्रमुख पंकज जगताप , शहरप्रमुख ओंकार तुपे आदि युवासैनिक व पदधिकारी उपस्थित होते