नगरसेवक चांदेरे यांना पोलिस संरक्षण द्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका गुंडाला बाणेर-बालेवाडीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे (NCP corporator Baburao Chandere) यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक चांदेरे यांच्या जिवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी चांदेरे यांचे पुत्र समीर चांदेरे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेची चतुःश्रृंगी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत सुपारी घेणारा कारागृहातील गुंड अनिल यशवंते याची चौकशी सुरु केली आहे.

चांदेरे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, कार्याध्यक्ष नितीन कळमकर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, विशाल विधाते, अर्जुन ननावरे, जंगल रणवरे, चेतन बालवडकर, अर्जुन शिंदे, मनोज बालवडकर, महादेव चाकणकर, प्रणव कळमकर, प्राजक्ता ताम्हाणे,सुषमा ताम्हाणे, अमोल भोरे, अवधूत लोखंडे, ओंकार रणपिसे आदीच्या शिष्टमंडळाने हे पत्र दिले आहे.