महंत परमहंस दास म्हणाले – ‘महिलेला फाशी दिली तर…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेरा वर्षापूर्वी (2008) उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे प्रियकरासोबत मिळून कुटुंबातील 7 जणांची हत्या करणाऱ्या शबनम या महिलेला न्यायालयाने दोषी ठरवले असून लवकरच तिला मथुरेतील तुरूंगात फासावर टकवले जाणार आहे. मात्र, अशातच शबनमचा मुलगा ताजने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी देखील राष्ट्रपतींना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी आवाहन केले आहे.

महंत परमहंस दास यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे की, हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा खूपच महत्वाचे स्थान दिले आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही. तर दुर्दैवी आणि आपत्तींना निमंत्रण मिळेल. तिचा गुन्हा माफ करण्यायोग्य नाही, परंतु स्त्री म्हणून तिला क्षमा केले पाहिजे. तसेच हिंदू धर्माचे गुरू असल्याने मी राष्ट्रपतींना शबनम यांची दया याचिका स्वीकारण्याचे आवाहन करतो. तुरुंगात तिच्या गुन्ह्याबद्दल तिने प्रायश्चित भोगले आहे. जर तिला फाशी दिली तर हा इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण अध्याय असणार आहे. आमची राज्यघटना राष्ट्रपतींना विलक्षण अधिकार देते, त्यांनी या अधिकारांचा उपयोग माफी देण्यासाठी करावा, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान एप्रिल 2008 मध्ये शबनमने प्रियकर सलीम याच्या मदतीने आपल्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली होती. शबनम आणि सलीमला फाशी देण्यात येणार आहे. जुलै 2019 पासून हे दोघे तुरूंगात आहे.