गोदावरी एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी; 10 महिन्यांपासून रेल्वे सुविधा बंद असल्याने चाकरमान्याचे प्रचंड हाल

लासलगाव, पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १० महिन्यांपासून रेल्वे सुविधा बंद (Railway facilities) असल्याने नाशिक,इगतपुरी,मुंबई कडे दररोज जाणाऱ्या चाकरमान्याचे प्रचंड हाल सुरू आहे.राज्याच्या अंतर्गत प्रवासासाठी उपयुक्त असणाऱ्या आणि अल्पउत्पन्न गटातील प्रवाशांना परवडणाऱ्या पॅसेंजर गाड्या (passenger trains ) आणि दररोज अपडाऊनसाठीची गोदावरी एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे.अनेकवेळा या गाड्या सुरू करणेबाबत जिल्ह्यातील प्रवाशी संघटने कडून मागणी केली जात आहे मात्र अद्यापही याबाबत काही निर्णय होत नसल्याने चाकरमानी यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईतून परराज्यांमध्ये जाण्यासाठी गाड्यांची पुरेशी उपलब्धता असताना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी मात्र अद्याप पुरेशी सुविधा उपलब्ध झालेली नाही. मुंबईतून भुसावळ, मनमाड, पुणे अशा पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या (passenger trains ) सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वसामान्यांसाठी लवकरात लवकर रेल्वे सुरू व्हाव्या अशी मागणी केली जात आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे घोषित लॉकडाउनमधून रेल्वे प्रवासाची सुविधा अद्याप अनलॉक झालेली नसल्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी उपयुक्त समजली जाणारी पॅसेंजर रेल्वेसेवाही अद्याप सुरू झालेली नाही. पॅसेंजर गाड्या हे अत्यंत कमी उत्पन्न गटातील प्रवाशांसाठी सोयीच्या असल्याने तसेच नियमित प्रवासासाठीही सर्वाधिक वापरासाठी वापरल्या जातात. ह्या गाड्यांमधून विनाआरक्षित प्रवाशांची संख्या जास्त असली तरी सुरक्षितचे नियम पाळून प्रवासाची अनुमती दिल्यास त्याचा लाभ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही होऊ शकतो.

परराज्यांमध्ये प्रवासाची चांगली सोय होत असताना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पोहोचण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ह्या सेवा बंद असल्याने याचा फटका नागरिकांसह चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. सध्या लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवासाची मुभा असली तरी ह्या गाड्या केवळ मोठ्या स्थानकांवर थांबत असून लहान स्थानकांना त्यातून वगळण्यात येते. त्याचा फटका बसत असून सुपरफास्ट गाड्यांचे शुल्कही अधिक असल्याने तसेच केवळ आरक्षित प्रवाशांनाच प्रवासमुभा असल्याने इतर प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येत नाही.

प्रतिक्रिया -शीतल ताथेड,लासलगाव
सर्वसामान्यांना प्रवासमुभा द्या…
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्णसंख्या घटू लागली आहे. सध्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याची गरज असून त्यासाठी गोदावरी एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्याना सुरू करून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास मुभा देण्याची आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया – मुन्ना शेख, रिक्षा चालक

गेल्या दहा महिन्यांपासून रेल्वे बंद असल्यामुळे रिक्षा पूर्णतः बंद पडलेल्या आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुद्धा अवघड झाले आहे रिक्षा सोडून आता भाजीपाला विकण्याची आमच्यावर वेळ आली आहे.