Pune : शहर पोलीस दलातील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बनावट Facebook; होतेय पैशांची मागणी, पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर या खात्यावरून पैसे मागण्यात येत आहेत. हा प्रकार समोर येताच सायबर पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हे खाते ब्लॉक करण्याची कारवाई करत सर्वत्र हे खाते फेक असून, कोणीही पैसे भरू नये असे आवाहन केले आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर येथील पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पिंपरी पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नावाने खाते तयारकरुन पैसे मागण्याचे प्रकार समोर आले होते. आता हे लोण पुणे पोलीस दलात आले असून, शहर पोलीस दलात प्रशासनाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने अज्ञाताने फेसबुक खाते तयार केले आहे.
त्या अज्ञाताने अनेकांना फ्रेंड Request पाठवल्या. त्यानंतर फ्रेंड Request स्वीकारताच त्यांना पैसे मागणी करत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर ही माहिती सुपेकर यांना समजताच त्यांनी सायबर पोलिसांकडे माहिती देत हे खाते ब्लॉक करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावरून ही माहिती प्रसारित करत मित्र परिवार व नागरिकांना आवाहन केले आहे.