धर्माच्या आधारावर मतं मागणारे यशस्वी झाले : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विजयी झाले आहेत. आम्ही तत्त्वं समोर ठेवून या निवडणुकीला सामोरे गेलो होतो. मात्र, धर्माच्या आधारावर मतं मागणारे यशस्वी झाले. पराभव झाला असला तरीही लोकांची सेवा मात्र सातत्याने करत रहाणार अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलतांना सुशीलकुमार शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापुरात लोकसभा मतदार संघात भाजपाचे सिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी अटीतटीची लढत होती. या लढतीत सिद्धेश्वर स्वामी यांचा विजय झाला. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा हा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. शिंदे जेव्हा प्रसारमाध्यमांसमोर आले त्यावेळी त्यांनी म्हंटले की, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीमुळे आम्हाला फटका बसला हे मान्य करावं लागेल. सुरूवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीचा फटका आम्हाला बसेल असं वाटत होतं. तसंच ते घडलं. जो पराभव झाला तो मला अपेक्षित नव्हता. मात्र जनतेने जो निर्णय दिला आहे त्यामुळे त्यांच्यापुढे मान झुकवली पाहिजे असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.