Pune : धक्कादायक ! छट पुजेला जाऊ दिलं नाही म्हणून केला हिंजवडीतील ठेकेदाराचा खून, आरोपीला UP मधून अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आठ दिवसापूर्वी हिंजवडीत झालेल्या ठेकेदाराच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. छट पुजेला गावी जाऊ दिले नाही म्हणून कामगारानेच ठेकेदाराची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कामगाराला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

अरविंद चौहान असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार व आरोपी कामगार हे हिंजवडीत एकाच खोलीत राहत होते. दि. 27 नोव्हेंबरला हिंजवडी परिसरातील जांभे येथे गणपत सदाशिव सांगाळे या ठेकेदाराचा बंद खोलीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता त्याच्या सोबत राहात असलेल्या कामगाराने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, आरोपी अरविंद हा फरार झाला होता. अधिक चौकशी केली असता अरविंदला छट पुजेसाठी गावाला जायचे होते. परंतू ठेकेदार सांगळेने त्याला सुट्टी न दिल्यामुळे त्याच्या मनात राग होता. या रागातून अरविंदने ठेकेदाराची हत्या करुन उत्तर प्रदेश येथे पळून गेला होता. याविषयी माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी एक पथक तयार करुन आरोपी अरविंदला उत्तर प्रदेशातील त्याच्या गावातून अटक केली आहे.