अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी त्यांना दात आलेले नसतात, तेव्हापासूनच घेतली पाहिजे. कारण आईच्या उदरातच त्यांच्या मौखिक आरोग्यास सुरूवात होते. यासाठी मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ही काळजी कशी घ्यावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

मौखिक स्वच्छता राखण्याची मुलांना सवय झाली पाहिजे. अशी काळजी घेतल्यस प्रौढ वयातही त्यांचे मौखिक आरोग्य चांगले राहते. दुधाच्या दातांचे खूप महत्व असते. निरोगी कायमचे दात आणि तुमच्या मुलाच्या उत्तम भाष्यासाठी दुधाचे दात खूप महत्त्वाचे ठरतात. वर्षातून किमान एकदा लहान मुलांच्या दातांच्या डॉक्टरांची भेट घ्या. यामुळे मुलांच्या तोंडाच्या आरोग्याबाबत माहिती मिळेल. काही त्रास असेल तर उपचार सुरू करता येतील. मुलांना दातांच्या डॉक्टरांची भीती दाखवू नये. योग्य मौखिक काळजी न घेणे, खाण्याच्या अयोग्य सवयी, पालकांमध्ये जगजागृतीचा अभाव आणि दातांच्या डॉक्टरांकडे न जाणे यामुळे ५ वर्षांखालील वयाच्या मुलांना दातांच्या समस्या निर्माण होतात. योग्य मौखिक स्वच्छता न राखल्यास बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे मुलांच्या खाण्यावरही परिणाम होतो आणि मुलांचे वजन कमी होते. मुलांचे मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व आहेत, त्यांचे पालन केले पाहिजे.

आई आणि बाळाच्या मौखिक आरोग्याचा एकमेकांशी संबंध असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गरोदर महिलेनं तिची मौखिक स्वच्छता ठेवली पाहिजे. फ्लुओरिडेट टूथपेस्टने दिवसातून दोनदा दात घासावेत. मॉर्निंग सिकनेस आणि उलटी होत असेल तर पाणी आणि बेकिंग सोडा याच्या मिश्रणाने चूळ भरावी. दात किडू नयेत यासाठी गोड खाणे टाळावे. हिरड्या सूजण्याची किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव होत असल्यास दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. मुलांच्या दातांची रचना तपासावी. ती योग्य नसल्यास ऑर्थोडोनटिस्टला भेटावे. कमी साखर असलेला योग्य असा आहार मुलांना द्यावा. मुलांना मौखिक स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच वर्षातून दोनदा दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.