Kolhapur News : शिवाजी विद्यापीठात 25 जानेवारीला शिक्षण विभाग आपल्या दारी उपक्रम

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असता त्यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात दि. २५ जानेवारीला दुपारी बारा ते साडेतीन यावेळेत शिक्षण विभाग आपल्या दारी हा उपक्रम राबविणार आहे असे सांगितले. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविले जाणार आहे. या उपक्रमासाठी उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव, संचालक आणि सहसंचालक उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी दिली.

मंत्री सामंत यांनी त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. उच्चशिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते समजून घेण्यासाठी शिक्षण विभाग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यानुसार दि. २५ जानेवारीला शिवाजी विद्यापीठात हा जनता दरबार स्वरूपाचा हा उपक्रम होईल. स्थानिक पातळीवरील प्रश्न याठिकाणी सोडविले जातील. मंत्रालय पातळीवर काही प्रश्न मार्गी लावले जातील, तसेच या उपक्रमापूर्वी सीमाभागामध्ये उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलाच्या कामाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाविद्यालयांबाबत चर्चा करून निर्णय-
पदवी प्रथम वर्षासह अन्य वर्षांच्या अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून जानेवारीअखेरपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यादृष्टीने महाविद्यालये, विद्यापीठांची वसतिगृहे त्यांच्या ताब्यात मिळाली आहेत का?, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, आदींबाबतची माहिती घेण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी सांगितले.