महापौरांनी घेतली जन्म-मृत्यू विभागाची झाडाझडती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जन्म व मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज दुपारी अचानकपणे जन्म-मृत्यू विभागात गेले. नागरिकांच्या रांगेत उभे राहून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व त्यानंतर जन्म-मृत्यू नोंद विभागाची चांगलीच झाडाझडती घेतली. अचानकपणे महापौरांनी भेट दिल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

याबाबत माहिती अशी की, अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचा सर्व्हर अनेक दिवस बंद होता. त्यानंतरही सर्व्हर वारंवार डाऊन होऊ लागल्यामुळे हजारो दाखले पेंडिंग आहेत. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘पोलीसनामा’ ने प्रसिद्ध केले होते. जन्म-मृत्यू विभागाकडून दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे आज दुपारी महापौर बाबासाहेब वाकळे हे अचानकपणे महापालिकेच्या जुन्या इमारतीत गेले. तेथे जन्म-मृत्यू नोंदणी विभागासमोर असलेल्या नागरिकांच्या रांगेत उभे राहिले. नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यांना कोणत्या-कोणत्या अडचणी येता. संबंधित विभागाकडून काय उत्तर दिले जाते, याची माहिती घेतली. त्यानंतर जन्म-मृत्यू नोंद विभागाने बंद केलेले दारे खिडक्या उघडण्यास सांगितले.

संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दखल घ्या. पुन्हा असे केल्यास गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास तातडीने कर्मचारी दिले जातील. पण नागरिकांची गरैरसोय करू नका, असे बजावले. अचानकपणे महापौरांनी भेट दिल्यामुळे जन्म-मृत्यू विभागाची चांगलीच धावपळ उडाली.

आरोग्य अधिकार्‍यांना घेतले फैलावर
जन्म व मृत्यू नोंद विभागाचे विभागप्रमुख असलेले आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचीही महापौरांनी चांगलीच झाडाझडती घेत फैलावर घेतले. नागरिकांच्या तक्रारींबद्दल तातडीने कार्यवाही करा. त्यांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या.