मोठा दिलासा ! आता गावातील पोस्ट ऑफिसमध्येही उघडता येणार PPF-MIS खाते, शहरात जाण्याची नाही गरज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गावात राहणाऱ्या लोकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ग्रामीण भागातील जाळे व टपाल कामकाज बळकट करण्यासाठी आणि खेड्यांमधील मोठ्या लोकसंख्येमध्ये लहान बचत योजना सुलभ करण्यासाठी पोस्ट विभागाने आता सर्व लघु बचत योजनांचा विस्तार केला आहे. म्हणजेच, गावच्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र (केव्हीपी), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) सारख्या योजनांमध्येही गुंतवणूक केली जाऊ शकते. आतापर्यंत या योजनांतर्गत खाती फक्त पोस्ट ऑफिसच्या नागरी शाखांमध्येच उघडली जाऊ शकत होती. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

नव्या आदेशाद्वारे शाखा पोस्ट कार्यालयांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या सुविधा उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण लोकांना आता त्याच पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या सुविधा मिळू शकतील, ज्याचा फायदा शहरातील रहिवासी घेत आहेत. ते त्यांच्या गावातील पोस्ट ऑफिसद्वारे लोकप्रिय बचत योजनांमध्ये बचत करू शकतील.

ग्रामीण पोस्ट ऑफिसमध्ये आता कोणत्या सुविधा ?
ग्रामीण भागात 1,31,113 शाखा पोस्ट कार्यालये कार्यरत आहेत. पत्र, स्पीड पोस्ट, पार्सल, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर, ग्रामीण पोस्ट लाइफ इन्शुरन्स या सुविधांशिवाय या शाखा पोस्ट कार्यालयांद्वारे आता पोस्ट ऑफिस बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव आणि सुकन्या समृध्दी खाते योजना देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भारताच्या सशक्तीकरणाच्या दिशेने विभागाने लोकांच्या घरात टपाल कार्यालयातील सर्व बचत योजनांमध्ये प्रवेश मिळवून दिलेले हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.