विभागीय लेखापाल १४ हजारांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन-अंबरनाथ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन कार्यालयातील संगणक दुरुस्तीचे बील मंजूर करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच स्विकारताना विभागीय लेखापालाला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमरास करण्यात आली.

शांतिकुमार बाबुराव पाटील (वय-५७) असे लाच घेणाऱ्या विभागीय लेखापालाचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

शांतिकुमार पाटील हा अंबरनाथ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन कार्यालयात विभागीय लेखापाल म्हणून कार्यरत आहे. तर तक्रारदार यांनी मे. क्लासिक कॉम्पुटर कंपनीच्या नावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये संगणक दुरुस्ती व देखभालीचे काम घेतले आहे. केलेल्या कामाचे बील मंजूर करण्यासाठी आणि पुढील कामाचे टेंडर देण्यासाठी पाटील याने मंगळवारी (दि.१३) १६ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये १४ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभगाने आज सापळा रचून १४ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.