नैराश्यावरील ‘या’ नव्या औषधाने डॉक्टरांना केले हैराण !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘जॅनसेने फार्मास्युटिकल्स’ने तयार केलेल्या ‘एस्केटामाइन’ या नैराश्यावरील नव्या औषधाला अमेरिकेत मंजुरी मिळाली आहे. ‘नेजल स्प्रे’च्या स्वरूपात मिळणारे हे औषध आतापर्यंतच्या औषधांमध्ये सर्वाधिक प्रभावी मानले जात आहे. अमेरिकेत स्प्रावॅटो नावाने त्याची विक्री सुरू आहे. मात्र काही डॉक्टर यातील अव्यवहार्य अडचणींमुळे त्रासले आहेत. औषधाची किंमत आणि दीर्घकाळ होणाऱ्या परिणामांवर डॉक्टरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हे औषध घेताच मतिभ्रम (हॅल्युसिनेशन) सारखी समस्या उद्भवत असल्याने अमेरिकेतील एफडीएने या औषधांसाठी अनेक शर्थी ठेवल्या आहेत. चार आठवड्यांत दोन वेळा डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे औषध घ्यावे, त्यानंतर दोन तास रुग्णालयात थांबावे, अशा या अटी शर्थी आहेत. आठवड्यातून दोन वेळा रुग्णालयात जाणे आणि तेथे दोन तास थांबणे रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. रुग्णालयांत जागेचीही अडचण संभवू शकते, असे ओरेगन हेल्थ अँड सायन्स विद्यापीठाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. एरिक टर्नर यांनी म्हटले आहे.

स्प्रावॅटो खूपच महागडे आहे. एका महिन्याला उपचारासाठी रुग्णाला ४७२० ते ६७८५ डॉलर म्हणजेच ३.३५ लाख ते ४.८१ लाख रुपये खर्च करावे लागतात. हे औषध रुग्णालयात घेण्याचा खर्चही वेगळा आहे. इतर औषधांच्या तुलनेत हा खर्च जास्त आहे. आतापर्यंत सामान्य अ‍ॅनेस्थेटिक औषधांद्वारे नैराश्यावर उपचार केला जातो. एस्केटामानच्या तुलने अन्य औषधे स्वस्त आहेत. मात्र, सामान्य अ‍ॅनस्थेटिक औषधांना नैराश्यावरील औषध म्हणून मंजुरी मिळालेली नाही.