अजित पवारांचा संभाजी पाटील-निलंगेकरांवर निशाणा, म्हणाले – ‘ढुसण्या मारायचे धंदे बंद करा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   लातूर ग्रामीण विधानसभेच्या जागेवरून माजी मंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याला देशमुख बंधूंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतली आहे. पवारांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना जोरदार टोला लगावला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

संभाजी पाटील निलंगेकर हे मागे मंत्री होते. केंद्रात आणि राज्यातही त्यांचं सरकार होतं. तेव्हा त्यांनी काही केलं नाही आणि आता ढुसण्या मारत आहेत. हे धंदे बंद करा अशा शब्दात पवारांनी निलंगेकरांना फटकारलं आहे.

औरंगाबादच्या विभागीय आढावा बैठकीत मंत्री अमित देशमुख आणि भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात आरोपांची जुगलबंदी पहायला मिळाली. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आरोप केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी होते अशी टीका अमित देशमुख यांनी केली होती. अमित देशमुख यांचे धाकडे बंधू धीरज देशमुख, देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार, तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तिघांना निवडून आणण्यासाठी तीन राजकीय पक्षांचं राजकीय फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला होता.