यापुढे लॉकडाउनचे नाव काढू नका : अजित पवार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या ( Corona) संकटामुळे राज्यात गेली ८ महिने लॉकडाउन ( lockdown) होता. या लॉकडाउनच्या काळात गोरगरीब आणि सामान्य जनतेचे खूप हाल झाले आहेत. यापुढे आपल्याला कोरोनाबरोबरच जगावे लागणार आहे. लोकांनी सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. पण यापुढे लॉकडाउनचे नाव काढू नका, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते कार्तिक एकादशीनिमित्त असलेली महापूजा पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.अजित पवार म्हणाले, गेल्या ८ -९ महिन्यांपासून हातावर पोट असलेल्यांची खूप बिकट अवस्था झाली आहे. त्यांनी जर रोज काम केले तर त्यांचा प्रपंच आणि घर चालते. त्यामुळे या लॉकडाउनचा फटका या सर्वसामान्य जनतेला बसतो. पण तरीसुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून जेव्हा जेव्हा लॉकडाउन घोषित करण्यात आला, तेव्हा सगळ्यांनी या नियमांचे काटेकोर पालन केले.

तसेच तुम्ही आषाढीची पूजा कधी करणार ? असे विचारले असता ते म्हणाले, आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते, पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालत राहावे. वारकरी संप्रदाय समंजस आहे. पण तरीसुद्धा काही लोकांकडून वेगळी भूमिका घेण्यात आली होती. तरीसुद्धा राज्यातील वारकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. कोरोनामुळे केंद्र व राज्यात कर जमा होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल, तर कडक कारवाई करावी लागेल, असा इशाराही अजित पवार यांच्याकडून देण्यात आला आहे.