गणेशोत्सव काळात कोणालाही दर्शनाची परवानगी देऊ नका, अजित पवारांच्या सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे यंदा मानाच्या गाणपतीसह कोणत्याच गणपतीचे दर्शनासाठी कोणालाही परवानगी देऊ नये, असे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पोलिसांना दिले आहे. तसेच गणेशोत्सव काळात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’ बाबत विधानभव सभागृहात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.

दर्शनासाठी परवानगी नाही

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, यंदाच्यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रत्येकाने गणेशोत्सव साधेपणाने आणि घरगुती स्वरुपात करावा. नागरिकांनी गणपती विसर्जन घरातच करावे तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करावे. विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कोणत्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना अजित पवार यांनी केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी उपाययोजना करा

पिंपरी चिचंवड आणि पुणे महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णदर व मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना देवून कोरोनाच्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले.

पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरु करा

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरु होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावे, असे सांगत पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.