हा आहे आत्तापर्यंतच्या उपमुख्यमंत्री पदाचा इतिहास, अजित पवारांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेला सेना भाजप युतीमध्ये लढले मात्र मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर दोघांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली नाही. शिवसेनेची मागणी होती की भाजपने सत्तेत समान वाटा द्यावा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावे. मात्र भाजपला हे मान्य नव्हते. अखेर शिवसेना युतीमधून बाहेर पडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठींब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राज्यात आतापर्यंत अनेकांनी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिलेले आहे आणि अनेकजण मुख्यमंत्री देखील झालेले आहेत. तर अनेकांना नशिबाने अगदी सहजपणे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली आहे तर अनेकांना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. राज्यात असेदेखील नेते आहेत ज्यांनी मुख्यमंत्री पदानंतर इतर खात्यांचादेखील कारभार पाहिलेला आहे. मात्र आतापर्यंत राज्यात असे एकदाही झालेले नाही की, जो उपमुख्यमंत्री आहे त्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली आहे.

काय सांगतो आतापर्यंतचा उपमुख्यमंत्र्यांचा इतिहास
१९७८ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना सुंदरराव साळुंखे उपमुख्यमंत्री होते. १९८३ ते ८५ या काळात रामराव आदिक, १९९५ ते ९९ भाजपाचे गोपीनाथ मुंडे, १९९९ ते २००३ दरम्यान छगन भुजबळ, २००३-०४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील, २००४ ते २००८ दरम्यान आर.आर पाटील, पुन्हा २००८ ते २०१० मध्ये छगन भुजबळ, त्यानंतर २०१०-१४ मध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं. अलीकडेच साडेतीन दिवसांसाठी आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या विस्तारात पुन्हा अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

अद्याप राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात उपमुख्यमंत्री पदावरील नेता मुख्यमंत्री झालेला दिसत नाही. राष्ट्रवादी सारख्या वजनदार पक्षाला देखील राज्यात आपला मुख्यमंत्री बनवता आलेला नाही. तशी राष्ट्रवादीला एकदा संधी होती देखील मात्र त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देत केंद्रात मंत्रिपद घेणे स्वीकारले होते.

एकूणच उपमुख्यमंत्रीपदाचा इतिहास काहीसा वेगळा असला तरी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे याला अपवाद ठरणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/