2.30 लाखांची लाच घेताना सातारा पालिकेचा उपमुख्यअधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात, 4 जण ‘रडार’वर

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असून आता कुठे व्यवसाय सुरू झाले आहेत. असे असताना सातारा पालिकेत मोठा भूकंप झाला आहे. ठेक्याची अनामत रक्कम देण्यासाठी तब्बल 2 लाख 30 हजार रुपयाची लाच घेताना उपमुख्याधिकारी संचित धुमाळ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. याप्रकरणात आणखीन एक अधिकाऱ्याचा समवेश असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेने गेल्या वर्षी घंटागाडीचा ठेका यशश्री व साई गणेश या खासगी कंपन्यांना दिला होता.

फेब्रुवारी 2020 मध्ये या दोन्ही कंपन्यांचा करार संपला आहे. करार करण्यापूर्वी यशश्री कडून 22 लाख रुपये अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली होती. या ठेकेदाराने ही रक्कम परत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. यापैकी सात लाख रुपये पालिकेकडून देण्यात आले. मात्र, उर्वरित पंधरा लाख रुपये देण्यासाठी उपमुख्यअधिकारी संचित धुमाळ व आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांकडून तीन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. अखेर दोन लाख 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ठेकेदाराने याची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाचेची पडताळणी करून सापळा रचला.

सोमवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सुहास शिर्के यांनी सापळा रचून धुमाळ याला तक्रारदाराकडून ठरलेली लाचेची 2 लाख 30 हजार रुपयाची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणात आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांची नावे समोर आली असून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाईमुळे पालिकेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, आणखी 4 जन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.