उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच : बाळासाहेब थोरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिल्याच व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शपथविधीनंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोणाला कोणते पद मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती.

आता हळू हळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहे, विधानसभा अध्यक्ष पदासाठी आता काँग्रेसच्या नाना पटोले यांचे नाव सुनिश्चित करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. मुबंईत पत्रकारांशी थोरात यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

या दोन नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत चुरस

उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीलाच दिले जाणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले असले तरी राष्ट्रवादीने अद्याप उपमुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट केलेले नाही. शिवतीर्थावर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली होती. सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा देखील होती. मात्र राष्ट्रवादीत आधीही उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ अनुभवलेले अजित पवार हे सुद्धा बडे नेते आहेत. अनेक नेत्यांची देखील अजित पवार यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कोणाकडे देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com