Pimpri News : आर.आर. आबांच्या आठवणींना अजित पवारांकडून उजाळा, म्हणाले – ‘ते लवकर गेले’

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत आर.आर. पाटील हे 12 वर्षे गृहमंत्री होते. आर.आर.पाटील लवकर गेले असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. पिंपरी चिंचवड शहरातून बदली झालेले आबांचे बंधू व सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस दल हायटेक करण्याचे ठरवले आहे. त्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयाच्या विविध अ‍ॅप्स आणि मिडिया पेजेस लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते आज (शुक्रवार) झाले. यावेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे व खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आर.आर. पाटील यांचे सख्खे बंधू सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे गृहमंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाही. ते अत्यंत संयमी आणि शांत व्यक्ती आहेत, अशा शब्दांमध्ये आबांचे बंधू राजाराम पाटील यांचे कौतुक केलं. राजाराम पाटील यांनी भाऊ गृहमंत्री असताना देखील वीस वर्षे साईड ब्रँचला काम केले. आबां सारखेच ते ही सदग्रहस्थ आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडला माझं झुकतं माप असतं, असे यावेळी सांगताना या शहरावर आपले किती प्रेम आहे, याचीच कबुली अजित पवार यांनी दिली. शहराचे सध्याचे पोलीस आयुक्तालय हे भाड्याच्या जागेत असल्याने चिखली येथे त्याला जागी दिली जाणार असून तेथे राज्यातील एक नंबरचे पोलिस आयुक्तालय करु, असे आश्वासन त्यांनी दिले. कारण आपण कामे करतो, ती एक नंबरच करायचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी स्पष्ट केलं.