पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या मुदतवाढीचा निर्णय प्रशासनाने घ्यावा : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर तत्काळ उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी जम्बो हॉस्पिटलच्या मुदतवाढीबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरम्यान, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सबाबत परिस्थिती पाहून जम्बो हॉस्पिटलला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामती हॉस्टेल येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. प्रशासनाची रणनीती काय असेल, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

२८ फेब्रुवारीला जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत संपणार आहे. त्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटलचा निर्णय विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून समितीने घ्यावा. कोरोनामुळे मृत्यू दर किती आहे, खासगी रुग्णालयांकडून सेवा घेण्यासाठी त्यांची सुविधांबाबत कितपत तयारी आहे, याबाबत माहिती घ्यावी. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या कालावधीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात प्रलंबित असलेली वैद्यकीय बिले द्यावीत. तसेच, इतर प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा
शासनाने दिलेल्या नियमांची अंलबजावणी काही नागरिकांकडून केली जात नाही. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करत मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला गती द्यावी. त्यासाठी महसूल, पोलिस, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त पथके तयार करावीत, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.