नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीवरून अजित पवारांचं मोठं विधान, दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालाचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाची चर्चा सुरु झाली होती. मात्र जिल्हा विभाजनाच्या चर्चेत तथ्य कोणतेही तथ्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात नवे जिल्हे आणि तालुक्यांची भर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली. मात्र अजित पवारांच्या या स्पष्टीकरणामुळे नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीला ब्रेक लागला आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजित पवार नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत विचारण्यात आले. ते म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असतात. कधीकधी त्या बातम्यांमध्ये तथ्य नसतं. 28 नवे जिल्हे होणार, हे कोणी सांगितलं, कधी चर्चा झाली, कोण बोलतंय ? आम्ही सगळे यात नवीन आहोत. कुठेही याबद्दल चर्चा नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, काही भागातील लोकांनी आमच्याकडे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी केली. मात्र, एक जिल्हा तयार करण्यासाठी सरकारला सातशे ते एक हजार कोटी रुपये लागतात. कुणाच्या मनात काहीतरी येतं आणि ते लोकं मांडतात. याचा आणि सरकारचा काहीही सबंध नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. याची मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांना देखील कल्पना नाही. एक नवा जिल्हा अस्तित्वात करण्यासाठी कोट्यावधी रुपये लागतात. जिल्हा निर्मितीची मागणी वेगवेगळ्या भागातून करण्यात येते मात्र आर्थिक परिस्थिती पाहून हे ठरवावे लागते. त्यामुळे या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीमध्ये तथ्य नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.