अजित पवारांनी सांगितलं ‘राज’कारण ! फडणवीसांनी दिल्लीला जावं, कारण ते जर दिल्लीला गेले तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचं आज उद्घाटन करण्यात आले. या उद्धघाटनला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलले आणि त्यांनी आपल्या शैलीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर फटकेबाजी केली.

या भाषणात अजित पवार म्हणाले की, पुस्तक बघितल्यानंतर मला जाणवलं की देवेंद्र फडणवीस एक उत्तम साहित्यिक होऊ शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राजकारण सोडून लेखक होण्यास काही हरकत नाही, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. तसेच अजित पवार म्हणाले की फडणवीसांनी दिल्लीला जावं, कारण ते जर दिल्लीला गेले तर सगळ्यात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मला अर्थसंकल्प समजावा यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे असं वाटतं. तसेच या विषयावर बोलण्याची वेळ माझ्यावर येईल असं काही वाटलं नव्हतं, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ही वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आमच्या अर्थसंकल्पांवर तुम्ही असेच पुस्तकं लिहीत राहा असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी दिल्लीत जाणार असल्याच्या बातम्या कुठून येतात, कशा येतात हे मला माहित नाही, पक्षाने मला महाराष्ट्रात विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन असे त्यांनी स्पष्ट केले.