‘चंपा’चे ‘ते’ विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, उपमुख्यमंत्री पवार यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ नते शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्यामुळेच ‘चंपा’चे ते विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा कठोर शब्दामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांना फटकारले आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ रविवारी बालगंधर्व येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला. मी चंद्रकांत पाटील यांच्या नावाचे संक्षिप्त रूप ‘चंपा’ असे केले. ते आता राज्यभर झाले आहे, असे सांगतच अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. ‘चंपा’चे शरद पवार यांच्याबद्दलचे वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, असेच मी म्हणेन. ते सध्या काहीही बरळायला लागले आहेत, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.

आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये तरुणांना तसेच त्यांच्यासोबत अनुभवी नेत्यांनाही संधी दिली जाणार आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार की नाही, याचा विचार कार्यकर्त्यांनी करू नये. तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या महापालिका निवडणुकांची प्रभागरचना करताना भाजपने सत्तेचा गैरवापर केला. मात्र आता राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे वॉर्ड रचना करताना तसे होणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांतदादा पाटील
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, असे विधान पाटील यांनी केले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे पाटील यांनी कौतुक केले होते. फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. यासाठी खोलात जाऊन त्यांना कायद्याचा अभ्यास केला. असे असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजांत अंतर निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. असे विष कालवणाऱ्यांचा शर्ट धरला पाहिजे, असेही पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या या विधानांनी आता मात्र मोठे वादळ उठले आहे.