कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यावरून ‘ब्रेक दी चेन’नुसार, राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याच निर्बंधांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती दिली जात आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनसदृश्य नियम लागू करण्यात आले आहेत. त्यावर विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना आता अजित पवारही नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अजित पवार यांची नाराजी ही नियमांत कठोरता नसल्याने असल्याची माहिती आहे. राज्यातील नागरिक संचारबंदीचे नियम पाळत नाहीत. राज्यात कडक निर्बंध असतानाही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत त्यांना अधिक कडक करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांचे मत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत जे नियम लागू करण्यात आले त्यामध्ये अधिक काटेकोरपणा आणून ते कडक करावेत. ज्या घटकांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे त्याची यादी कमी करावी, असेही अजित पवार यांचे म्हणणे आहे.

आज निर्णय होण्याची

राज्यात ‘ब्रेक दी चेन’नुसार अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदीही लागू आहे. पण तरीही रुग्णसंख्या अपेक्षित अशी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.