Pune News : ‘तडीपार करेन नाही तर, मोक्का लावेन, कोणाची गय करणार नाही’; अजित पवार भडकले

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती तालुक्यामध्ये सावकारीची प्रकरण समोर आल्यानंतर आज (रविवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावकरी करणाऱ्यांना आपल्या शैलीत सज्जड दम दिला आहे. ते म्हणाले, मनगटशाहीच्या जोरावर जर बारामतीकरांना कोणी अडचणीत आणणार असेल आणि कायदा जुमानणार नसेल तर त्याला तडीपार करीन, मोक्का लावेन, मग तो किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय करणार नही, अशा शब्दात सावकारीच्या प्रकरणावर अजित पवार गरजले.

बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या नातेवाईक किंवा कुणी जवळचा असले तर त्याला आजच या सावकारी प्रकारापासून दूर राहण्यासाठी समजावून सांगा, असा सल्ला उपस्थितांना दिला. कोरोनानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात अजित पवार होत होते.

यावेळी विकासाबाबत बोलताना अजित पवार यांनी सावकारीबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, कायदा हातात घेणाऱ्यांची गय करणार नाही. सावकारीमध्ये कुणी अडकला असेल तर त्याची शिफारस करण्यासाठी माझ्याकडे यायचे नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देताना बारामतीच्या कायदा सुव्यस्थेबाबत आपण किती जागरूक आहोत, हे सांगितले.

सहकारावर मर्यादा घालणे चुकीचे

केंद्र सरकारवर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, सहकारी बँकांसह इतर संस्थांवर केंद्राचे मोठ्या प्रमाणात निर्बंध येत आहेत. अनेक अडचणींना सहकारी संस्थांना सामोरे जावे लागत आहे. केंद्राचे धोरण सहकार अडचणीत आणण्याचे आहे, असे चित्र आहे. सहकारावर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न चुकीचा असल्याचे अजित पवार म्हणाले.