अजित पवारांनी CM उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा, पण चर्चा होतेय ट्विट केलेल्या फोटोची

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा खास फोटोही शेअर केला असून, याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांनी शुभेच्छा देताना बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनातील फोटो ट्विट केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे बसलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे, अशा शब्दात पवार यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागील दोन दिवस सामनातून मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत महाविकास आघाडीसंदर्भातउत्तर देताना, राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्या हाती आहे. दोघे (राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस) मागे बसलेले आहेत. असे वक्तव्य केले होते. आज अजित पवारांनी शुभेच्छा देताना ट्विट केलेल्या फोटोचा या विधानाशी संबंध लावला जात आहे. फोटोत उद्धव ठाकरे आणि अजित पवार गाडीत बसलेले असून, स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती आहे.